गूँज ऑफ़ सीतारामची महफील ७ नोव्हेंबरला
हनुमान अंश ची टीम साधणार नागपूरकरांशी संवाद
नागपूर: ( दि. ४ नोव्हें २०२६ )
भक्तिसंगीत, रामभक्ती आणि सामूहिक गायनाचा अनोखा संगम असलेली नागपुरातील सर्वात मोठी भजन बैठक गूँज ऑफ़ सीताराम येत्या शनिवार ७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. झिरो माईल यूथ फाउंडेशनच्या वतीने मानकापूर येथील प्रतिष्ठित अशा खाशाबा जाधव इनडोअर स्टेडियम (मानकापूर इनडोअर स्टेडियम) येथे सायंकाळी ६ वाजता या भव्य कार्यक्रमाचा सोहळा रंगणार आहे.
सोशल मीडियावर सध्या अल्पावधीतच प्रचंड चर्चेत असलेल्या आणि नीम करोली बाबा यांच्या जीवनप्ररेणेवर आधारित बहुचर्चित हनुमान अंश या चित्रपटाची संपूर्ण टीम या कार्यक्रमासाठी नागपुरात दाखल होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक विशाल चतुर्वेदी संगीत दिग्दर्शक शंतनू सुदामे व धीरेंद्र मुलकलवार तसेच ख्यातनाम गायक साधू सुशील तिवारी आणि सुनील लोधी यांच्यासह सुमारे २० जणांची नामवंत कलाकार मंडळी या भजन बैठकीत थेट सादरीकरण करणार आहेत.
चित्रपटातील गाजलेली भक्ती गीते जसे की हे खरारी, पार्वती आणि जय हनुमान यांसारखी लोकप्रिय सुरावटींची पर्वणी संगीतप्रेमींना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.
संगीत में भक्ति, भक्ति में सभी का संग या सुंदर संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात भजन, सूफी संगीत, रामभक्ती आणि लाइव्ह जॅमिंगचा अनोखा मिलाफ पाहायला मिळणार आहे. नागपूरकरांसाठी ही केवळ भजन बैठक नसून एक अलौकिक आध्यात्मिक सोहळा ठरणार आहे.
हा भव्य कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असला, तरी प्रवेशिकांच्या आधारावरच स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर आसनव्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि समस्त धर्मप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत झिरो माईल यूथ फाउंडेशनचे कल्याण देशपांडे, प्रशांत कुकडे आणि समय बनसोड, जॅमिंग बैठकचे मयूर मोटवानी, नो डिफरन्स फाउंडेशन व हाफ टाईमचे हिंमाशू अरमारकर, माहौलचे यश तुमाने व पारस रोकडे, तसेच सागर गभणे (माधव नेत्रालय) प्रामुख्याने उपस्थित होते.



























































































































































































































































































































































































































































































































































