राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय येथे अत्याधुनिक दंत विभाग, शल्यक्रिया गृह व प्रसूती कक्षाचे लोकार्पण
नागपूर, ( दि. ८ ऑगस्ट २०२६ )
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय, सोमवारी पेठ, नागपूर येथे शुक्रवारी अत्याधुनिक दंत विभाग, शल्यक्रिया गृह आणि प्रसूती विभागाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर तसेच राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या शुभहस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले.
यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या महापौर निताताई ठाकरे, आमदार मोहनजी मते, उपमहापौर लीलाताई हातीबेड तसेच महानगरपालिका आरोग्य विभागाचे उपसभापती श्रीकांत आगलावे यांनी फित कापून नव्या सुविधांचे लोकार्पण केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली व्यवहारे यांनी प्रास्ताविकातून कर्मचारी राज्य विमा योजनेचा इतिहास, महाराष्ट्रातील ESI सेवेचे पहिले केंद्र म्हणून नागपूरचे ऐतिहासिक महत्त्व आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या सुविधांमुळे विमाधारक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या दर्जेदार आरोग्यसेवेचा आढावा मांडला.
या आधुनिक सुविधा उभारण्यासाठी आणि प्रकल्प यशस्वीपणे पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाण, प्रशासकीय संचालक सोहम वायळ तसेच वैद्यकीय संचालक डॉ. अशोक थोरात यांनी केलेले मार्गदर्शन, नियोजन आणि विशेष सहकार्य मोलाचे ठरले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सातत्यपूर्ण पाठबळामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला असून, याबद्दल कार्यक्रमात त्यांच्याप्रती विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या नव्या सुविधांमुळे नागपूर व विदर्भातील हजारो विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना अधिक आधुनिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून कर्मचारी राज्य विमा सेवेच्या बळकटीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या कार्यक्रमाचे संचालन डॉ हर्षवर्धन कांबळे वैद्यकीय अधिकारी आणि आभार प्रदर्शन डॉ किशोर गिरी निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी केले.
या कार्यक्रमास रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

































































































































































































































































































































































































































































































