विनोदी उकळीने नागपूरकर झाले लोटपोट
★ रेशिमबाग मैदानावर रंगला सांस्कृतिक सोहळा
नागपूर ( दि. २ फेब्रु. २०२६ ) नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे रेशिमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात सोमवारी सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत पाहायला मिळाली. यावेळी सादर करण्यात आलेल्या उकळी या विनोदी नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. या नाट्यप्रयोगादने प्रेक्षकांना पोटभर हसविले, तर समूह नृत्यांनी कार्यक्रमात चैतन्य भरले.
नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे अंत्योदय दीनदयाल नागरी राष्ट्रीय उपजिविका मिशन अंतर्गत शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महिला उद्योजिका मेळावा आयोजित केला आहे.
तिसऱ्या दिवशी समूह नृत्याचे आणि विनोदी नाटक उकळी ने प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नगरसेविका निता ठाकरे, नगरसेविका श्रीमती सारिका नांदुरकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मोनिका भगवाघर, कविता बाकरे, अभिषेक बेल्लावार, नरेंद्र भोवते, उपअभियंता सचिन चमाटे आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना नगरसेविका निता ठाकरे म्हणाल्या की, शहरातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने आपण हात दिला पाहिजे. त्यामध्ये महिलांच्या स्वतःच्या कलाकुसरीचा विषय असो त्यांचे लघुउद्योग असो या सगळ्या गोष्टींनी ज्या ज्या महिला कार्यरत आहेत त्या सर्व महिलांना एकूणच बाजारपेठ आणि एकूणच आर्थिक स्वावलंबन या दृष्टीने तयार होण्यासाठी मदत करण्याचा मानस नागपूर महानगरपालिकेचा निश्चितपणे कौतुकास्पद आहे. तसेच नगरसेविका सारिका नांदुरकर म्हणाल्या की, महिला उद्योजिका मेळाव्यामुळे बचत गटाच्या महिलाना रोजगारासाठी चांगले व्यासपीठ मिळाले असल्याचा उल्लेख केला. यावेळी मोनिका भगवाघर, कविता बाकरे यांनी महिलांना रोजगारासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना या समूह नृत्याने झाली. त्यानंतर मराठमोळ्या माय मराठी लावणीच्या आणि राजस्थानी केसरीया लोकनृत्य नृत्याच्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती प्रभात क्रिएटिव्ह व्हिजन नागपूर निर्मित उकळी ही एकांकिका, चाळीत राहणारा संतोष जाधव एका अपघातात उद्योगपती अंबानी यांच्या मुलाचे प्राण वाचवतो. या उपकाराची परतफेड म्हणून अंबानींचा मॅनेजर संतोषला ब्लॅक चेक देतो. तो चेक हातात आल्यावर चाळीतील लोकांच्या भावनांची जी उकळी फुटते आणि त्यातून उडणारी विनोदी तारांबळ, याचे अतिशय सुंदर चित्रण या एकांकिकेत करण्यात आले आहे. पैशांच्या मागे न धावता नाती आणि स्वप्नांना जपण्याचा सकारात्मक संदेश यातून देण्यात आला. उकळीचे लेखक चैतन्य सरदेशपांडे असून, दिग्दर्शक अभिषेक बेल्लारवार आहे. नेपथ्य शुभम मस्के, आशिष ठाकरे यांचे होते तर रंगमंच व्यवस्था अभिषेक घोगरेकर यांची होती, यात रोहित धांगरेकर, शरयू मते, मेधना गोरे, ऐश्वर्या शिंदे, संकल्प पायाळ, अथर्व देव, अभिषेक घांगरेकर, चिन्मय गवळी, शुभम मस्के, आशिष ठाकरे, नेत्रा रेटर, पारस फुले, ऋषिकेश लंगोट, प्रणव चंडवके, आकाश बरवाड, विनया मते, धनश्री नगुलवार या कलाकारांनी उत्तम अभिनय करून श्रोत्यांची वाहवा आणि टाळ्या मिळविल्या. कार्यक्रमाचे संचालन संपदा पंडित यांनी केले.




























































































































































































































































































































































































































