स्व. देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम स्कूलचा १०० टक्के निकाल
★ मनस्वी नन्नोरे ९४.२० टक्क्यांसह शाळेतून प्रथम; ८ विद्यार्थी मेरिटमध्ये
हिंगणा ( दि. ८ में २०२६ ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून. या परीक्षेत हिंगणा येथील स्व. देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम हायस्कूल व जुनिअर कॉलेजने आपले वर्चस्व सिद्ध करत १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. यावर्षी शाळेतून एकूण १०२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्याने शाळेने निकालाची शतकी परंपरा अबाधित ठेवली आहे.
शाळेच्या या देदीप्यमान यशात ८ विद्यार्थ्यांनी मेरिटमध्ये स्थान मिळवले असून ३९ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणीत यश संपादन केले आहे. यामध्ये कु. मनस्वी नन्नोरे हिने ९४.२० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकावला. शौर्य गोटे याने ९४ टक्के गुणांसह द्वितीय, तर हर्षा बोदलखंडे हिने ९३.८० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला. याव्यतिरिक्त टिपूर पौरकर (९१.८०%), वंश पुंड (९१.६०%), कु. जीनत अन्सारी (९१%), सिद्धी तिवसकर (९०.८०%) आणि मंदार नन्नोरे (९०.४०%) यांनीही उत्कृष्ट गुण मिळवून शाळेच्या नावलौकिकात भर घातली.
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र बंग (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), उपाध्यक्ष अरुणा बंग, कोषाध्यक्ष महेश बंग, शाळेचे प्राचार्य नितीन तुपेकर व सर्व शिक्षकवृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, आई-वडील आणि संस्थेच्या भक्कम पाठिंब्याला दिले.


























































































































































































































































































































































































































































