E20 पेट्रोल पूर्णपणे सुरक्षित; 500 ppm क्लोराइड आणि आर्द्रतेचे दावे ठरले फोल!
नवी दिल्ली (७ ऑगस्ट २०२६): E20 पेट्रोलमधील आर्द्रता आणि क्लोराइडबाबत पसरलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) देशव्यापी तपासणी मोहीम राबवली. या तपासणीत E20 पेट्रोलची गुणवत्ता सर्वोच्च मानकांनुसार सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पेट्रोलमध्ये क्लोराइडचे प्रमाण ५०० ppm असल्याचा दावा खोटा ठरला असून, प्रत्यक्ष नमुन्यांमध्ये ते केवळ ० ते ३ ppm (अत्यल्प) आढळले आहे.
रिफायनरी, डिस्टिलरी, डेपो आणि १,००० पेक्षा जास्त पेट्रोल पंपांवरील (RO) नमुन्यांची शास्त्रीय चाचणी करण्यात आली. देशभरातील सुमारे ९०,००० पेट्रोल पंपांवरील भूमिगत टाक्यांची दररोज ८ ते १२ वेळा तपासणी केली जात असून, कुठेही पाणी शिरल्याचे आढळलेले नाही. केवळ ४ तुरळक प्रकरणांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळताच तेथील पुरवठा त्वरित थांबवून आवश्यक दुरुस्ती करण्यात आली.
इंधनाची गुणवत्ता सर्वोच्च राखण्यासाठी बहुस्तरीय यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता E20 पेट्रोलचा निवांत आणि विश्वासाने वापर करावा.

































































































































































































































































































































































































































































































