खासदार भजन स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ फेब्रुवारीपासून
★ प्रवेश अर्ज आजपासून उपलब्ध, ३० जानेवारीपर्यंत मुदत
■ केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांची संकल्पना
नागपूर ( दि. २३ जानेवारी २०२६ ) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार भजन स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष यंदाच्या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. या स्पर्धेसाठी उद्या, शुक्रवार, दि. २३ जानेवारीपासून प्रवेश अर्ज उपलब्ध होणार असून अर्ज सादर करण्यासाठी ३० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
नागपूरातील सहा विधानसभा क्षेत्रात या स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली आहे. मध्य नागपूरची प्राथमिक फेरी ६ फेब्रुवारीला शिक्षक सहकारी बँक सभागृहात, दक्षिण नागपूरची प्राथमिक फेरी ७ फेब्रुवारीला श्री साई मंदिर, अयोध्या नगर येथे, पूर्व व उत्तर नागपूरची प्राथमिक फेरी ९ फेब्रुवारीला श्री हरिहर मंदिर लकडगंज येथे, पश्चिम नागपूरची प्राथमिक फेरी ११ फेब्रुवारीला श्रीराम मंदिर रामनगर, तर दक्षिण पश्चिम नागपूरची प्राथमिक फेरी १२ फेब्रुवारीला छत्रपती सभागृह, वर्धा रोड येथे सकाळी ९ ते ६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धकांना २ गीते ८ मिनिटांच्या आत सादर करायची आहेत. पहिले गीत हे संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग किंवा भक्तीगीत आणि दुसरे विठ्ठलाचा १ अभंग किंवा भक्तिगीत असावे. ही भजन स्पर्धा युवा व ज्येष्ठ अश्या दोन वयोगटात होणार असून युवा वयोगटात ७ तर ज्येष्ठ (३५ ते ७०) वयोगटातून १२ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. खासदार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट्ट सभागृहात होणार आहे. यामध्ये २१ भजनी मंडळांना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
या भजन स्पर्धेच्या नोंदणीसाठी मा. नितीनजी गडकरी यांच्या खामला चौकातील (देवनगर) जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत संपर्क साधावा, असे आव्हाहन खासदार भजन स्पर्धेचे संयोजक डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले आहे.




























































































































































































































































































































































































































