नितीन गडकरी यांचे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे वस्त्र तुला
नागपूर ( दि. २७ मे २०२६ ) देशाच्या विकासाला नवे आयाम देणारे, जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विकासपुरूष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे वस्त्र तुला सोहळा आयोजित करून अनोख्या पद्धतीने अभिनंदन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साह, भावना आणि सामाजिक संवेदनांनी भारावलेला ठरला.
एन्रिको हाइट्स येथे पार पडलेल्या या विशेष उपक्रमासाठी आकर्षक तुला उभारण्यात आली होती. फुलांच्या सजावटीने, वस्त्रांच्या राशींनी, शुभेच्छांच्या वर्षावाने आणि मंगलमय वातावरणाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि शंखनादाच्या मंगल स्वरांत वस्त्र तुला विधीला प्रारंभ झाला. एका पारड्यात नितीनजी गडकरी विराजमान झाले, तर दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाइतकी वस्त्रे ठेवण्यात आली. जिवेत् शरदं शतम् च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात करीम आपल्या लाडक्या नेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवर्जुन उपस्थिती लावली. या उपक्रमातून संकलित झालेली सर्व वस्त्रे उन्हातान्हात कष्ट करणारे हॉकर्स, श्रमिक, हातावर पोट भरणारे कामगार तसेच गरजू बांधवांना सन्मानपूर्वक वितरित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी दिली. समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता जपत नितीनजी गडकरींचा वाढदिवस साजरा करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी समितीचे उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर व अशोक मानकर, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, खा. मायाताई इवनाते, अविनाश घुशे, रेणुका देशकर, चेतन कायरकर, किशोर पाटील, मनीषा काशीकर, योगेश बन, प्रमोद पेंडके, विजय फडणवीस, शैलेश ढोबळे, गुड्डू त्रिवेदी, महेंद्र राऊत तसेच समितीचे इतर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























































































































































































































































































































































































































































