घरोघरी पोहोचला शिवरायांचा विचार; देवकीबाई बंग शाळेच्या विद्यार्थ्यांचा अनोखा लोकसंवाद उपक्रम
हिंगणा ( दि. २० फेब्रु. २०२६ ) रयतेचे राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे केवळ ढोल-ताशांचा गजर किंवा मिरवणूक नव्हे, तर त्यांचे विचार आचरणात आणणे होय.
हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून, स्वर्गीय देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी केवळ शाळेच्या भिंतींआड उत्सव साजरा न करता, थेट नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन शिवरायांचा समता, बंधुता आणि मानवतेचा विचार पोहोचवला.
मिरवणूक नव्हे, विचारांची पालखी!
या उपक्रमात शाळेतील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. हाती भगवे ध्वज आणि ओठी 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष करत हे बालमावळे वानाडोंगरी, महाजनवाडी, हिंगणा, तीवसकरवाडी, गुमगाव आणि धनगरपुरा या परिसरातील गल्लीबोळांत पोहोचले. प्रत्येक घराचे दार ठोठावून विद्यार्थ्यांनी नागरिकांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी दिलेला स्त्री सन्मानाचा संदेश, अठरापगड जातींना एकत्र बांधणारी बंधुता आणि रयतेच्या कल्याणाची नीती आजच्या काळात किती महत्त्वाची आहे, हे या चिमुकल्यांनी मोठ्या प्रभावीपणे मांडले.
केवळ घोषणाबाजी न करता, विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे नागरिक भारावून गेले होते. "महाराज केवळ इतिहासाच्या पुस्तकात नाहीत, तर ते आपल्या आचरणात असायला हवेत," असे सांगणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि राष्ट्रप्रेमाची भावना खऱ्या अर्थाने रुजल्याचे दिसून आले.
संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री रमेशचंद्रजी बंग , उपाध्यक्ष सौ. अरुणा बंग आणि कोषाध्यक्ष महेश बंग यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. तसेच, सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
केवळ पुस्तकी ज्ञान न देता, मुलांना समाजाशी जोडणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने शिवरायांना दिलेली मानवंदना आहे. अशा भावना यावेळी पालकांनी व्यक्त केल्या.




























































































































































































































































































































































































































