पोलिस आयुक्तांनी केले तेजस्वीच्या कलेचे कौतूक
★ तेजस्वी ने कॅनव्हासवर साकारले विलक्षण कल्पनासृष्टीचे चित्र
नागपूर:( दि. ४ फेब्रु. २०२६ ) कला ही केवळ रेषा, रंग आणि आकारांची जुळवाजुळव नसते; तर सौंदर्याला सजीव आणि भीषणतेला निर्जिव बनविण्याची शक्ती तिच्यात दडलेली असते. हीच कला एका लहानग्या विद्यार्थिनीच्या हातून प्रकट झाली आणि पाहणाऱ्यांनाही आश्चर्यचकित करून गेली. स्टेशन रोडवरील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सातवीत शिकणारी तेजस्वी शैलेश भोयर हिने कॅनव्हासवर रेखाटलेले चित्र पाहून नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल थक्क झाले.
तेजस्वीने बनविलेले चित्र ही केवळ बालकलेची झलक नसून त्यात तिची कल्पना शक्ती, निरीक्षणश, रंगांचे आकलन करण्याची बुद्धिमत्ता आणि भावनांचे क्षुष्म निरीक्षण करून ती कन्व्हासवर साकारण्याची क्षमता स्पष्टपणे जाणवते. विशेष म्हणजे, तिच्या मागे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण, मार्गदर्शन किंवा व्यावसायिक कला शिक्षण नाही. तरीही तिच्या कॅनव्हासवरील रंगसंगती, सौंदर्यदर्शन आणि तपशीलांची मांडणी पाहणाऱ्यांच्या नजरा खिळवून ठेवणारी आहे.
पोलिस आयुक्तांनी हे चित्र पाहताच तिची मुक्तकंठाने प्रशंसा केली. एवढ्या लहान वयात असा अप्रतिम कलाविष्कार पाहून डॉ. सिंगल यांनी तेजस्वीला चित्रकलेतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचे लक्ष्य निश्चित ठेवण्याचा सल्ला दिला. यावेळी तेजस्वीनेही भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर पेंटिंग तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या या इच्छेला प्रोत्साहन देत आयुक्तांनी तिला चित्रस्पर्धा, प्रदर्शन तसेच विविध कला उपक्रमांत संधी उपलब्ध करून देण्याचे ठोस आश्वासन दिले. त्यांनी तिला विशेष भेट देऊन तिचे मनोबल अधिक वाढवले आणि शुभेच्छा दिल्या. कॅनव्हास पेंटिंगविषयी पोलिस आयुक्तांना आधीपासूनच विशेष ओढ आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांनी नागपुरात चार दिवसांची भव्य चित्रकला कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत देशभरातील ख्यातनाम चित्रकार सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी तेजस्वीसारख्या प्रतिभेचा शोध घेऊन तिला योग्य संधी देण्याचा निर्धार व्यक्त केला. तेजस्वी भोयरची ही कलावंत म्हणून घेतलेली छोटीशी उडी भविष्यात मोठ्या झेपेचे पाऊल ठरू शकते. एका विद्यार्थिनीच्या कलेने निर्माण केलेली ही प्रेरणा आजच्या पिढीतील बालप्रतिभांना नवी दिशा दाखवणारी आहे. पोलिस आयुक्तांकडून मिळालेलं प्रोत्साहन तिच्या कलाप्रवासाला नक्कीच नवी ऊर्जा देणारे ठरेल.




























































































































































































































































































































































































































