११ वर्षांनंतर देऊळ बंद २ ची ब्लॉकबस्टर एन्ट्री; १९ दिवसांत ७० कोटींचा गल्ला!
चित्रपटाची कमाई शेतकरी कुटुंबांना देणार! लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे यांची नागपुरात घोषणा
★ संपूर्ण महाराष्ट्रात शो हाउसफुल्ल; पहिल्याच दिवशी ३.०५ कोटींची विक्रमी कमाई
नागपूर ( दि. १० जुन २०२६ ) प्रतिनिधी:
२०१३ साली प्रदर्शित झालेल्या आणि श्रद्धा विरुद्ध विज्ञान या विषयावर मराठी प्रेक्षकांच्या मनाव गाजवणाऱ्या सुपरहिट देऊळ बंद चित्रपटाच्या सिक्वेलने तब्बल ११ वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. बहुचर्चित देऊळ बंद २ या चित्रपटाने प्रदर्शित होताच मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॉकबस्टर एन्ट्री केली असून, प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातून मिळणारा पैसा शेतकरी कुटुंबांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा लेखक-दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी आज नागपूर येथील पत्रकार परिषदेत केली.
बॉक्स ऑफिसवर कमाईची घोडदौड
देऊळ बंद २ ने पहिल्याच दिवशी ३.०५ कोटी रुपयांची धमाकेदार कमाई करत नवा इतिहास रचला आहे. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमुळे अवघ्या १९ दिवसांत या चित्रपटाने ७० कोटींपेक्षा जास्त कमाईचा टप्पा पार केला असून बॉक्स ऑफिसवर याची घोडदौड सुरूच आहे.
पुणे, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, नागपूर, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. सिंगल स्क्रीनपासून ते मल्टिप्लेक्सपर्यंत
★ तिसऱ्या आठवड्यातही 'हाउसफुल्ल'चे बोर्ड झळकत आहेत.
सोशल मीडियावरही देऊळ बंद २ ची जोरदार चर्चा रंगली आहे. चित्रपटातील दमदार संवाद, खिळवून ठेवणारे कथानक, भावनिक प्रसंग आणि उत्कृष्ट संगीताचे प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी भागातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण सहकुटुंब चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. उत्कृष्ट छायांकन आणि प्रभावी पार्श्वसंगीत यामुळे चित्रपट अधिक भव्य वाटतो.
वटवृक्ष इंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले असून, निर्मिती कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत आहेत. सोबतच महेश मांजरेकर, सविता मालपेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, ओम भुतकर, संस्कृती बालगुडे, प्रविण तरडे, मुकुंद वसुले यांसह अनेक दिग्गज कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
आज नागपूर येथे जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या विशेष उपस्थितीत एक भव्य पत्रकार परिषद पार पडली. यावेळी निर्माते कैलाश वाणी, प्रविण विठ्ठल तरडे, अभिनेते मुकुंद वसूले, तंत्रज्ञ संकेत धोटकर, तसेच 'लीड मीडिया पीआर आणि मार्केटिंग'चे कुशल कोंडे व अनुप गोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. अभूतपूर्व प्रतिसादामुळे देऊळ बंद २ हा यंदाच्या वर्षातील मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरल्याची चर्चा आता चित्रपट वर्तुळात रंगली आहे.


























































































































































































































































































































































































































































