एमआयडीसी हद्दीत अज्ञात ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू
नागपूर :(दि. ३ नोव्हें २०२६) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोन चौक परिसरात एका भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीस्वार महिला प्राध्यापिकेला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे प्राध्यापिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला.
प्रियंका प्रविण मोरे (वय ३५, रा. आरती अंपायर, विवेकानंद हॉस्पिटलजवळ, नागपूर) असे मृत प्राध्यापिकेचे नाव असून, त्या वानाडोगरी येथील वायसीसी कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जीवन नामदेवराव डेहनकर (वय ४०, रा. महात्मा गांधी नगर, हुडेश्वर, नागपूर) आणि त्यांची सहकारी सौ. प्रियंका मोरे हे दोघेही वायसीसी कॉलेज, वानाडोगरी, एमआयडीसी येथे एकत्र नोकरीला आहेत. मंगळवारी सकाळी फिर्यादीची सहकारी प्रियंका ह्या आपली ॲक्सेस दुचाकी (क्र. एमएच ४९ सीएन ६८९३) ने एमआयडीसी हद्दीतील हिंगणा रोडवरील झोन चौकातून आपल्या कार्यस्थळाकडे जात होत्या. यादरम्यान मागून भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात ट्रकचालकाने आपल्या ताब्यातील वाहन अतिशय निष्काळजीपणे व धोकादायक रीतीने चालवून त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली.
या अपघातात प्रियंका मोरे या गंभीर जखमी झाल्या असून, अपघात घडल्यानंतर अज्ञात ट्रकचालक घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला. घटनेनंतर जखमी प्राध्यापिकेला तातडीने उपचाराकरिता वानाडोगरी येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तेथील डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी फिर्यादी जीवन डेहनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१) तसेच सहकलम १८४, १३८, १७७ मोटार वाहन कायद्यान्वये (मो.वा.का.) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस ठाण्याच्या पोउपनि. मनिषा जाधव करत आहेत.



























































































































































































































































































































































































































































































































































