लॉ कॉलेज कंपाऊंडजवळ शस्त्राचा धाक दाखवून धुमाकूळ घालणारा जेरबंद
★ अंबाझरी पोलिसांची धडक कारवाई
नागपूर : ( दि. २५ ऑक्टों २०२६ ) अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास हातात शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि धिंगाणा घालणाऱ्या एका तरुणाला अंबाझरी पोलिसांनी पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आरोपीकडून एक लोखंडी चाकू जप्त करण्यात आला आहे.
उत्कर्ष उर्फ ऋषी दिनेशचंद रॉय (वय २६, रा. प्लॉट क्र. ५६, कोराडी ग्रामपंचायत जवळ, कोराडी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:४० वाजता ते २५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे १२:२५ वाजताच्या दरम्यान अंबाझरी पोलिसांचे गस्ती पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, लॉ कॉलेज कंपाऊंडच्या बाजूला काळा टी-शर्ट आणि काळी पँट घातलेला एक इसम शस्त्रासह धुमाकूळ घाजत आहे. या सूचनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.
पोलिसांना पाहताच हुल्लडबाज इसमाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलिसांनी धाडसाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. पंचसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कंबरेत काळ्या रंगाच्या कव्हरमध्ये एक लोखंडी चाकू (किंमत अंदाजे २०० रुपये) लपवून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ तो चाकू जप्त केला.
आरोपी हा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगून सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालत होता आणि पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत होता. या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ४, २५ सहकलम १३५ मुंबई पोलीस कायद्यान्वये (म.पो.का.) गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



























































































































































































































































































































































































































































































































































