खापरखेड्यात गांजाची विक्री करणाऱ्या इसमास अटक; ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
खापरखेडा:( दि. १८ सप्टेंबर २०२६ ) गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने व खापरखेडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गांजाची विक्री करण्यासाठी उभ्या असलेल्या एका आरोपीला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ४६४ ग्रॅम गांजा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पोलीस उपायुक्त परिमंडळ ६ चे विशेष पथक खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. दरम्यान, चनकापूर सिल्लेवाडा वस्ती रोडवरील गणेश मंदिरासमोरील स्ट्रीट लाईटखाली काळ्या रंगाच्या होंडा ॲक्टिव्हावर शैलेश नावाचा इसम गांजा विक्रीसाठी उभा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, संशयित आरोपी ॲक्टिव्हा (क्र. MH 49 CE 5705) वर बसलेला आढळला. त्याची झडती घेतली असता नाव शैलेश रामलाल सूर्यवंशी (वय ४४, रा. ओम नगर, चनकापूर, खापरखेडा) असे निष्पन्न झाले. गाडीच्या डिक्कीत प्लास्टिक पिशवीमध्ये ४६४ ग्रॅम ८५० मिलिग्राम गांजा सापडला. आरोपीची कसून चौकशी केली असता, हा गांजा त्याने त्याचा साथीदार अयुब छुट्टन सिद्दीकी (वय ४७, रा. चनकापूर) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगण्यात आले. खापरखेडा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शैलेश याला अटक करण्यात आली आहे, तर पाहिजे असलेल्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. अजिंक्य कदम, पोहवा. मुकेश महालगावे, अरुण चांदणे, मंगेश लांजेवार, पोअं. हेमचंद निल गंगावणे आणि चापोअं. शुभम ठाकूर यांनी केली.



























































































































































































































































































































































































































































































































































