हुडकेश्वर परिसरात भीषण अपघात; दुचाकी घसरून झालेल्या दुर्घटनेत तरुण ठार, एक जण गंभीर जखमी
★ मित्राची गाडी घेऊन जेवण करून परतत असताना घडली दुर्घटना
★ हुडकेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
नागपूर (दि. २५ ऑक्टों २०२६ ) हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत एका भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मेडिकल हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
आर्यन गुणवंत लांडे (वय २०, रा. प्लॉट क्र. ७४, महाकाली नगर, हुडकेश्वर, नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर प्रमथेश योगेश शिरपुरकर (वय २२, रा. प्लॉट क्र. १८४, भोळेबाबानगर) असे जखमी मित्राचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आर्यन लांडे हा आपल्या मित्राची गाडी घेऊन प्रमथेश शिरपुरकर याच्यासोबत आऊटर रिंग रोडवर जेवण करण्यासाठी गेला होता. जेवण आटोपून दोघेही घरी परतत असताना हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील पिपळा खरसोली रोड, डीमार्टजवळ, आस्था नगर बाजूला त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.
रस्त्यावरील एका दगडावरून गाडी गेल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. या धडकेत दोघेही खाली कोसळून गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी आर्यन लांडे याला मृत घोषित केले, तर जखमी प्रमथेशवर सध्या उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी मृताचा भाऊ अमन गुणवंत लांडे (वय २३, रा. महाकाली नगर, हुडकेश्वर) यांच्या सूचनेवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक नरेश साखळकर यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.



























































































































































































































































































































































































































































































































































