मनिषनगरमधील संताजी सोसायटीत मोठी घरफोडी; साडे नऊ लाखांचा ऐवज लांबवला
नागपूर : ( दि. २३ ऑक्टों २०२६ ) बेल्तरोडी पोलीस ठाणे हद्दीतील मनिषनगर परिसरातील एका बंद घराचे कुलूप आणि खिडकीची ग्रील तोडून अज्ञात चोरांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण ९ लाख १२ हजार १५० रुपयांचा ऐवज लांबवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेल्तरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजेपासून ते १९ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. प्लॉट क्र. १३४, संताजी सोसायटी, मेहेरे ले-आऊट, मनिषनगर, नागपूर अमित दिलीप मिश्रा (वय ४२ वर्षे) हे आपल्या वैयक्तिक कामासाठी मुंबई येथे गेले होते, तर त्यांची पत्नी, मुले आणि घरकाम करणारा कुणाल दांडे हे घरला कुलूप लावून मूळ गावी गेले होते. घराला कुलूप बंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोराने घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरुमची खिडकीची ग्रील काढून घरात प्रवेश केला. चोराने बेडरुममधील लाकडी कपाटातून ४,८०,०००/- रुपये रोख, सीसीटीव्ही डीव्हीआर (CCTV DVR), तसेच सोन्याचे विविध दागिने असा एकूण ९,१२,१५०/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादी अमित मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेल्तरोडी पोलीस ठाण्याचे पोउपनि. नारायण घोडके यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध व पुढील तपास सुरू आहे.



























































































































































































































































































































































































































































































































































