धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ग्लोबल वेल्फेअर असोसिएशनतर्फे फळवाटप व वृक्षारोपणाचा संदेश
नागपूर ( दि. २२ ऑक्टों. २०२६ ) : 70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ग्लोबल वेल्फेअर असोसिएशन, नागपूर यांच्या वतीने लोकमत प्रांगण येथे धम्म बांधवांसाठी निःशुल्क फळवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, मानवता, बंधुभाव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनीसखी मंचच्या अध्यक्षा तथा अभिनेत्री विभा गजभिये होत्या. संस्थेचे अध्यक्ष विनोद राऊत, महासचिव अधिर बागडे, मुख्य संयोजक अरुण सोमकुवर आणि सहसंयोजक बुद्धपाल बागडे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी उपस्थित धम्म बांधवांना फळांचे निःशुल्क वितरण करण्यात आले. तसेच या दिनाचे औचित्य साधून पर्यावरण नीती मूल्य यांच्या वतीने फळझाडांची रोपे आणि पाण्याच्या बाटल्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरणाचे संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक सेवेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवतेच्या विचारांना अभिप्रेत असलेले सामाजिक कार्य पुढे नेण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या माध्यमातून समाजात सामाजिक एकात्मता, परस्पर सहकार्य आणि पर्यावरणाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मानवतेची सेवा आणि पर्यावरणाचे संवर्धन हीच समाजाप्रती खरी बांधिलकी” या भावनेतून ग्लोबल वेल्फेअर असोसिएशनने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
कार्यक्रमाला रमेश काकडे, मिलिंद चंद्रागडे, अशोक धमगाये, अनिल गजभिये, रिता बागडे, कुंदा राऊत, ललिता बागडे, डॉ. ज्योती चंद्रागडे, प्रतिभा गजभिये, शितल सोमकुवर आणि गुलाबराव बावनकुडे, यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



























































































































































































































































































































































































































































































































































