भारतीय संविधान व महापुरुषांच्या ग्रंथांचे भव्य मोफत वाटप संपन्न
★ बारमासे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
विशेष वृत्त | नागपूर:
( दि. २० ऑक्टो २०२६ ) रिपब्लिकन विद्यार्थी संघटना (नागपूर शहर) यांच्या वतीने ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रिपब्लिकन विद्यार्थी संघटना नागपूर शहरच्या वतीने शहरात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान तसेच महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा प्रसार करणाऱ्या ग्रंथांचे बौध्द अनुयायांना, नागरिकांना व विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले.
हा महत्त्वाचा उपक्रम लक्ष्मीनगर चौक येथे पार पडला. महापुरुषांचे विचार आणि संविधानप्रेमी नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा या ग्रंथवाटप कार्यक्रमास उदंड प्रतिसाद लाभला.
हा यशस्वी उपक्रम रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेच्या नागपूर शहर अध्यक्षा मोहिनी रोशन बारमासे यांच्या मार्गदर्शनाखाली व रोशन बारमासे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे, देवेंद्र बागडे, एडोकेट लुभेश मेश्राम, प्रेमकुमार गजारे, माजी जिल्हा परिषद सद्स्य दिनेश बंन्सोड आदी मान्यवर उपस्थित होते. बारमासे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, युवकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि महापुरुषांचे विचार घराघरांपर्यंत पोहचावेत, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे तरुण पिढीत संविधानाविषयी आदर निर्माण होण्यासोबतच पुरोगामी विचार जोपासण्यास मोठी मदत होत असल्याचे उपस्थितांनी मनोगतात व्यक्त केले.



























































































































































































































































































































































































































































































































































