न्यू इरा ग्रुपच्या ३०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाचे लोकार्पण थाटात
★ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले उदघाटन
नागपूर : ( दि. २४ ऑक्टों.२०२६ ) न्यू इरा ग्रुपच्या ३०० खाटांच्या नवीन अत्याधुनिक हॉस्पिटलचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मोठया थाटात करण्यात आले. उत्कृष्ट सुविधा, अत्याधुनिक उपचार व्यवस्था आणि कुशल डॉक्टरांचा हा संगम आता नागपूरसह मध्य भारतभरातील जनतेच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे.
या उद्घाटनाच्या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी माजी खासदार तथा लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा, आमदार कृष्णा खोपड़े, चैनसुख संचेती, संजय खुटे, प्रताप अडसड, हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद संचेती, उज्ज्वल पगारिया, डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. निदिश मिश्रा, अझीम प्रेमजी हेल्थकेयर फंडचे अधिकारीगण यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या प्रकल्पाचे कौतुक करून हॉस्पिटलला उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा दिल्या.
लोकोपयोगी आणि उत्तम आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णालयातील नामांकित व तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
३०० खाटांची क्षमता असलेले हे अत्याधुनिक हॉस्पिटल नागपूरसह मध्य भारताच्या आरोग्य क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरणार असून, येथे सर्वसामान्यांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.



























































































































































































































































































































































































































































































































































