नागपूर-भंडारा रोडवर अज्ञात ट्रकच्या धडकेत ४० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू
नागपूर ( दि. २३ ऑक्टों २०२६ ):
नागपूर-भंडारा रोडवरील सुरुची कंपनीजवळ एका अज्ञात ट्रक चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने, हयगयीने व निष्काळजीपणे चालवून एका ४० वर्षीय इसमाला जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने सदर इसमाचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारडी पोलीस ठाण्याचे बिटमार्शल हद्दीत पेट्रोलिंग करत असताना नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की, सुरुची कंपनीजवळ एक इसम अपघात अवस्थेत पडला आहे. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तिथे एक अनोळखी इसम (वय अंदाजे ४० वर्षे) मृत अवस्थेत दिसून आले. मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तीने अंगात ग्रे रंगाचा हाफ टी-शर्ट (ज्यावर पाठीमागे 'फेविकॉल' असे लिहिलेले आहे), काळ्या रंगाची फुलपॅन्ट आणि पायात काळी पावसाळी चप्पल घातली होती.
घटनास्थळाची पाहणी व विचारपूस केल्यानंतर, अज्ञात ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्राणांतिक अपघात घडल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी मेयो हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश श्रीरामे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पारडी येथे पोउपनि. निखिल भराटे यांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात कलम २८१, १०६(१) भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.), सहकलम १३४, १७७, १८४ मोटर वाहन कायद्यान्वये (मो.वा.का.) गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीचा शोध व पुढील तपास सुरू आहे.
( बातमी मधील कोटो एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्यात आली आहे )



























































































































































































































































































































































































































































































































































